< Go Back

वर्धापनदिन संगीत महोत्सव - २०२२


(2022)

या वर्षीचा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित केलेला संगीत महोत्सव १३ नोव्हेंबरला संपन्न झाला. हा महोत्सव दिनांक ११, १२ आणि १३ नोव्हेंबरला केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात संपन्न झाला. तिन्ही दिवशी मोठ्या संख्येने रसिकांनी हजेरी लावली. सभागृह पूर्ण क्षमतेने भरलेले होते ही मोठ्या समाधानाची बाब होय. हल्लीच्या T २० व तत्सम जमान्यामध्ये तिन्ही दिवस मोठ्या संख्येने रसिकांची शास्त्रीय संगीत कार्यक्रमांना लाभलेली हजेरी ही नक्कीच आशादायक व आनंदाची गोष्ट. महोत्सवाची सुरुवात पंडित नयन घोष यांच्या सतार वादनाने झाली. त्यांच्या साथीला तबल्यावर त्यांचा मुलगा ईशान घोष होता. कार्यक्रमाची सुरुवात राग पटदीपने केली. हा काफी थाटातील राग. बऱ्याच वर्षांनी हा राग मैफिलीत ऐकावयाला मिळाला. पारंपरिक पद्धतीने आलाप, जोड, झाला व नंतर विलंबित व द्रुत गत या पद्धतीने सादर केला. त्यानंतर कामोद राग त्यांनी पेश केला. कामोद रागामध्ये त्यांनी उस्ताद इनायत हुसैन खान, रामपूर - सहेस्वान घराण्याचे मूळ संस्थापक ह्यांची मध्य लय तीन तालातील व दुसरी द्रुत एक तालातली बंदीश उस्ताद इनायत हुसैन खाँ साहेबांचे नातू उस्ताद इझियाक हुसैन खान (प्रसिद्ध उस्ताद मुस्ताक हुसैन खान ह्यांचे ज्येष्ठ सुपुत्र) यांनी बेतलेली अतिशय मधुर अशी बंदिश गाऊन व वाजवून सादर केली. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी खमाजमधील नजाकतदार ठुमरी पेश केली. मध्यांतरानंतर राग यमन अतिशय ताकदीने सादर केला. यमनच्या सगळ्या छटा अत्यंत तरलपणे व सुरेलपणे सादर केल्या. यमन नंतर राग तिलक कामोद वाजविला. व शेवट भैरवीने केला. संपूर्ण वादन हे अतिशय तरल, सुरेल व गायकी अंगाने वाजविले हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य. तबल्यावर ईशानने अप्रतिम साथ केली. पं. घोष हे गायक, तबला वादक व सतारवादक असा त्रिवेणी संगम साधणारे कलाकार आहेत. ते त्यांनी अतिशय सुंदरपणे सिद्ध केले. ईशानने तबलासुद्धा जणू सूरच बोलत होते अशा प्रकाराने वाजविला. पिता पुत्रांच्या जोडीने कमाल केली.

दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित जयतीर्थ मेवुंडींचा झाला. त्यांच्या लोकप्रियतेमुळे सभागृह खचाखच भरले होते. संध्याकाळची वेळ असूनसुद्धा त्यांनी शुद्ध सारंग रागाने मैफिलीची सुरुवात केली. दर्जेदार गायन असेल तर कुठल्याही वेळी कुठलाही राग चांगलाच वाटतो हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. शुद्ध सारंग नंतर मारवा राग गायला. उचित वेळ असल्याने हा राग चांगलाच रंगला. नंतर त्यांनी ठुमरी सादर केली. मध्यांतरानंतर राग जयजयवंतीने सुरुवात केली. त्यानंतर त्यांनीच तयार केलेला राग मधुप्रीया गायला. हा राग मधुकौंसाच्या जवळचा आहे. धैवताच्या जागी पंचमाचा वापर केलेला आहे. कार्यक्रमाची सांगता राग भैरवीने केली. दमदार आवाज, सुरेलपणा, तानांवरची हुकूमत ही किराणा घराण्याची खासियत त्यांच्याकडे आहेच. मध्यांतरापूर्वी खास प्रेक्षकांच्या फर्माइशीमुळे त्यांनी राग बसंत बहारदारपणे सादर केला. कुठलाही राग असो, उत्तमरीतीने दमदारपणे सादर करण्याची त्यांनी हातोटी लाजबाब आहे. तबल्यावर श्री. यशवंत वैष्णव व संवादिनीवर श्रीमती अदिती गराडे यांची साथ संगत अगदी उचित व बहारदार होती. त्यांची समजही वाखाणण्यासारखी होती. त्यांना साथ करणारा कुमारवयीन परब सुद्धा आपली छाप रसिकांच्या मनावर पाडून गेला. या वयात त्याची जी तयारी त्याने दाखविली त्यावरून भविष्यकाळातला उत्तम गायक तो होईल यात शंका नाही. एकंदरीतच मैफिल अप्रतिम झाली.

तिसऱ्या दिवशीच्या कलाकार होत्या जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी श्रीमती श्रुती सडोलीकर-काटकर. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी भीमपलासने केली. खास जयपूर घराण्याच्या थाटात रागाची संथ पण उत्कृष्ट मांडणी केली. भीमपलास नंतर धीरगंभीर आणि सहसा न ऐकिवात असलेला पूर्वा राग त्यांनी सादर केला. मंद्र सप्तकापासून तार सप्तकांपर्यंतचे सूर लावून त्यांनी याही वयात केलेल्या तपस्येने काय साधता येते याची श्रोत्यांना यथार्थ जाणीव करून दिली. त्यानंतर हंसकिंकीणी हा राग त्यांनी गायला. मध्यांतरानंतर श्रुतीताईंनी राग कौशी कानडा गायला. रागाच्या अप्रतिम मांडणीमुळे सर्व श्रोतुवर्ग मंत्रमुग्ध झाला होता. मुळातच अतिशय गोड असा हा राग श्रुतीताईंनी फारच नजाकतीने सादर केला. त्यानंतर खास जयपूर घराण्याची डागोरी व ठुमरी (आज बात जिया मे लागी) ही सादर केली. ठुमरी सादर करण्यातल्या सर्व भावनाविष्कार त्यांनी समर्थपणे उलगडून दाखविल्या. कार्यक्रमाची सांगता भैरवीने केली. त्यांना तबल्यावर श्री. विश्वनाथ शिरोडकर व संवादिनीवर श्री. अनंत जोशी यांनी सुरेल व उत्तम साथ संगत केली. त्यामुळे कार्यक्रम आणखीनच उठावदार झाला. प्रेक्षकांनीसुद्धा मुक्तपणे त्यांची पसंती दाखविली.

अशा प्रकारे तीन दिवसांचा हा महोत्सव अतिशय यशस्वीरीत्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंदाने सादर केला व शास्त्रीय संगीतातली आपली प्रतिष्ठा अबाधित राखली. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या लक्षात दीर्घकाळ राहील यात शंकाच नाही.

महिंद्र फायनान्स व न्यू मयूर केटरर्स आणि डेकोरेटर्स यांनी या महोत्सवाला अर्थसहाय्य केले.