2017- Sahitya Rang Mahotsav

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे १६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ‘प्रवासवर्णनं आणि पर्यटन’ या विषयावर साहित्यरंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे यांनी महोत्सवाचे उद् घाटन केले.  संस्थेचे अध्यक्ष एन्. एन्. श्रीखंडे यांनी सांगितले की ‘पूर्वी फक्त जन्म आणि मृत्यू या कारणांसाठीच प्रवास केला जात असे परंतु आता लोक स्थलदर्शनासाठीही खूप प्रवास करतात. प्रवासवर्णनांच्या संख्येत वाढ झाली पाहिजे.’ कार्याध्यक्ष सुरेश खरे यांनी महोत्सवाचे उद्दिष्ट सांगून यांतील कार्यक्रम हे प्रवासवर्णनांच्या पुस्तकांवर आधारित असल्याचे सांगितले. महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. ‘विविधरंगी पर्यटन’ या विषयावर संपदा जोगळेकर, नरेंद्र मेस्त्री, नरेंद्र प्रभू आणि प्रवीण दाखवे यांच्या मुलाखती शिवानी जोशी यांनी घेतल्या. बोटीवरून एकट्याने जगप्रदक्षिणा करून त्यावर पुस्तक लिहिणारे कॅप्टन दोंदे यांची मुलाखत सुरेश खरे यांनी घेतली. प्रवासवर्णनाच्या पुस्तकांतील उताऱ्यांचे अभिवाचन केले इला भाटे, रजनी वेलणकर आणि अजित भुरे यांनी. उत्तर धृव आणि दक्षिण धृव या दोन्ही ठिकाणी जाऊन त्यावर पुस्तक लिहिलेल्या राजश्री काकतकर यांनी चित्रफितींच्या आधारे अनुभव कथन केलं. तुषार जोग आणि सतीश साठे यांनीही त्यांच्या भ्रमंतीबद्दल अनुभवकथन केलं. विद्या धामणकर यांनी लडाखवर पुस्तक लिहिलेल्या इशा टूर्सचे आत्माराम परब यांची मुलाखत घेतली. केंद्राच्या पुस्तक स्पर्धेतील विजेत्या लेखकांनी चित्रफितींच्या आधारे पुस्तकातील कांही भागांवर सुंदर भाष्य केलं. सर्व कार्यक्रम अतिशय रंगले. प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. हा महोत्सव ‘अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्टने’ प्रायोजित केला होता.